ढगाळ हवामानामुळे हरभरा पिकावर घाटेअळीचा प्रादुर्भाव

Foto
कन्नड, (प्रतिनिधी) : तालुक्यात आठ दिवसांपासून सतत ढगाळ वातावरण राहिल्याने हरभरा पिकावर घाटेअळीचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून, शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. सध्या हरभरा पीक फुलोरा व घाटे धरण्याच्या अवस्थेत असल्याने घाटेअळीचा हल्ला अधिक घातक ठरत आहे. 

अनेक शेतांमध्ये हरभऱ्याचे घाटे पोखरलेले, पाने कुरतडलेली दिसत असून, उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

तालुक्यातील औराळा, चिंचोली लिंबाजी, पिशोर, नाचनवेल, देवगाव रंगारी भागात शेतकऱ्यांनी अळीचा प्रादुर्भाव वाढल्याचे सांगितले. ढगाळ हवामान, वाढलेली आर्द्रता आणि कमी सूर्यप्रकाशामुळे घाटेअळीच्या वाढीस पोषक वातावरण आहे. 

शेतकऱ्यांना उशिराने प्रादुर्भाव झाल्याचे लक्षात आल्याने नुकसान वाढले. योग्यवेळी नियंत्रण न मिळविल्यास हरभऱ्याच्या उत्पादनात ३० ते ४० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता आहे. कृषी विभागानेही मार्गदर्शन शिबिरे घेऊन शेतकऱ्यांची मदत करावी असे आवाहन केले आहे.

अनेक ठिकाणी घाटेअळी पेट घाट्यांवर हल्ला करत असल्याने याचा उत्पादनावर मोठा परिणाम होणार आहे. एका सरीत सरासरी दोन ते तीन अळ्या आढळल्यास तत्काळ उपाययोजना करावी. सुरवातीला निंबोळी अर्क किंवा जैविक कीटकनाशक वापरावेत. प्रादुर्भाव अधिक असल्यास शिफारशीनुसार योग्य कीटकनाशकांची फवारणी करावी.
- संदीप शिरसाठ, तालुका कृषी अधिकारी, कत्रड